शिक्षणाला नवा आयाम देण्याच्या उद्देशाने यशवंतराव चव्हाण सेंटर, शिक्षण विकास मंचच्या माध्यमातून दोन दशकाहून अधिक काळ शिक्षणक्षेत्रात काम करत आहे. विद्यार्थ्यांना आकलन होण्यासाठी अध्यापन पद्धतीमध्ये बदल करून नवीन उपक्रम राबवले तर ते परिणामकारक ठरल्याचे दिसून आले. ज्या शिक्षकांनी नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला तसेच विद्यार्थ्यांना वर्गातून बाहेर काढून थेट समाजाचे अनुभव दिले, ते देताना वेगवेगळ्या माध्यमांचाही उपयोग केला, अशा शिक्षकांच्या नवोपक्रमांची ओळख करून देण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरने ‘नवोपक्रमांच्या नवलनगरी’ या पुस्तकाची निर्मिती केली आहे. ‘डिजिटिकल वर्क्स' या प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.
राज्याचे माजी शिक्षण संचालक व ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. वसंत काळपांडे हे या पुस्तकाचे मुख्य मार्गदर्शक आहेत. राज्य मुख्याध्यापक महामंडळाचे प्रवक्ता आणि उपाध्यक्ष महेंद्र गणपुले आणि मेंदू व शिक्षण अभ्यासक डॉ. श्रुती पानसे यांच्या अनुभवी संकलनातून हे पुस्तक साकारले आहे.
पारंपरिक शिक्षणाचा कित्ता पुढे गिरवत न्यायचा, की आजच्या काळातल्या विद्यार्थ्यांसमोर असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी शिकवण्यात बदल करायचा, हा निर्णय अनेक शिक्षक घेत असतात. ‘राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020’ मध्ये अशा नवोपक्रमांच्या उपयोगाचा उल्लेख करण्यात आला आहे.
‘नवोपक्रमांच्या नवलनगरी’मध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक असलेले शिक्षक, विद्यार्थी, शिक्षणक्षेत्रात कार्यरत असणारे तज्ज्ञ यांच्यासह जिज्ञासू वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक आहे.
नवोपक्रमांच्या नवलनगरी तुमच्या शाळेतही घडायला हवी; यासाठी प्रत्येक पालकाने, शिक्षकाने आणि वाचकांनी जरूर घ्यावे.
संकल्पना व मार्गदर्शन
डॉ. वसंत काळपांडे
डॉ. वसंत काळपांडे यांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, राज्य शिक्षण मंडळ, बालभारती, बालचित्रवाणी अशा शालेय शिक्षणाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या संस्थांमध्ये संचालक म्हणून काम केले आहे. आपल्या 35 वर्षांच्या कारकिर्दीत राज्य शासनाच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजनांच्या आखणीत आणि यशस्वी अंमलबजावणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
केंद्र सरकारच्या दिल्ली येथील राष्ट्रीय शैक्षणिक प्रशासन आणि नियोजन संस्थेतही त्यांनी काही काळ काम केले आहे. सेवानिवृत्तीनंतर ते शिक्षणक्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना आणि व्यक्तींना मार्गदर्शन देत आहेत. केवळ शालेय शिक्षणावरील चर्चेसाठी त्यांनी सुरू केलेल्या व्हाट्सअॅप आणि फेसबुक ग्रुपचे 20 हजारपेक्षा जास्त सदस्य आहेत.
शालेय शिक्षण या विषयावर त्यांचे अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले असून, वृत्तपत्रे व नियतकालिके यांमध्ये ते सातत्याने अभ्यासपूर्ण आणि परखड लेखन करत असतात. त्यांच्या ‘शालेय प्रशासन आणि मानवी संबंध’ या पुस्तकाला 1992 चा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला होता.
संपादक
महेंद्र गणपुले
कोअर कमिटी सदस्य, शिक्षण विकास मंच