ज्येष्ठांचा पथदर्शक

ज्येष्ठांचा पथदर्शक

ज्येष्ठांसाठी शारीरिक मानसिक आरोग्याची काळजी, उत्तर आयुष्यातील आर्थिक घडी टिकवण्यासाठीचे सल्ले, सामाजिक अनुबंधाची जोपासना, तसेच डिजिटल तंत्रज्ञानाची उपयुक्तता आणि स्वीकार यासह अनेक महत्त्वाच्या विषयांवर प्रकाश टाकण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटरने "ज्येष्ठांचा पथदर्शक" या मराठी तसेच "Sliver Strength - A Guide to Senior Empowerment" इंग्रजी पुस्तकाची निर्मिती केली आहे. डिजिटिकल वर्क्स' या प्रकाशन संस्थेने हे पुस्तक प्रकाशित केले आहे.

या पथदर्शकाचे वैशिष्ट्य म्हणजे ज्येष्ठांसाठी महत्त्वाच्या विविध विषयांचे सुस्पष्ट आणि व्यापक संदर्भ. जसे की, इच्छापत्र तयार करणे, लिव्हिंग विल, आरोग्य व कल्याण, स्मृतिभ्रंश कसा हाताळावा, सायबर फसवणुकीपासून संरक्षण कसे मिळवावे, ज्येष्ठांसाठीचे हेल्पलाइन क्रमांक इत्यादी व्यावहारिक टिप्स, मैत्रीपूर्ण सल्ले व साधनसंपदेसह हा मार्गदर्शक ज्येष्ठ नागरिकांना सन्मानाने, आत्मविश्वासाने, वार्धक्य आनंदवयी करण्यास मदत करतो. डॉ.अनघा तेंडुलकर पाटील आणि ॲड. प्रमोद ना. ढोकळे यांच्या अनुभवी लेखणीतून हे पुस्तक साकारले आहे.

वयोमानाने आयुष्यात नवी आव्हानं तशा नव्या संधीही निर्माण होतात. आयुष्याच्या या रुपेरी कालखंडात ज्येष्ठांसाठी मौल्यवान माहिती आणि व्यावहारिक सल्ला महत्त्वाचा. म्हणून हा पथदर्शक.

ज्येष्ठांची काळजी घेणाऱ्या प्रत्येक जबाबदारीयुक्त व्यक्तीसाठी तसेच जिज्ञासू वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त असे हे पुस्तक आहे.

लेखक

प्रमोद ढोकळे

ॲड. प्रमोद एन. ढोकले

ॲड. प्रमोद एन. ढोकले FESCOM या ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यरत अग्रगण्य शिखर संघटनेचे कायदेशीर सल्लागार आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या हक्क आणि कल्याणासाठी ते कायदेशीर विषयात हिरीरीने सक्रिय सहभाग घेतात. माहितीचा अधिकार (RTI) कायदा, प्रकल्पग्रस्त पुनर्वसन कायदा, घरगुती हिंसाचार कायदा यांच्या निर्मितीत त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांनी मुंबई विद्यापीठात भारतीय राज्यघटना, पर्यावरण संरक्षण कायदा आणि भारतीय दंड संहिता या विषयांवर पाच वर्षे अध्यापन केले आहे. तसेच ते गेली तीन दशके यशवंतराव चव्हाण सेंटरच्या विधी व सेवा सेंटरचे सक्रिय सदस्य आहेत. त्यांनी ज्येष्ठांना कायदेशीर माहिती व मार्गदर्शन मिळावे यासाठी ‘Advocate Pramod Dhokale Simplifying Court Decisions’ हे YouTube चॅनेल सुरू केले आहे.

डॉ. अनघा तेंडुलकर पाटील

डॉ. अनघा तेंडुलकर पाटील

डॉ. अनघा तेंडुलकर पाटील या सोफिया कॉलेज फॉर वुमेन (स्वा यत्त), मुंबई या महाविद्यालयाच्या प्राचार्या आहेत. त्या समाजशास्त्र विभागाच्या प्रमुख असून सामाजिक संशोधनात सक्रियपणे सहभागी आहेत. त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या समाजशास्त्र विभागातून वृद्ध व्यक्तींसाठी सामुदायिक काळजी (Community Care for Elderly) या विषयावर पीएचडी पदवी प्राप्त केली आहे. वार्धक्याचे समाजशास्त्र, आयुर्मानाचे समाजशास्त्र, ऐतिहासिक समाजशास्त्रीय विचार तसेच सामाजिक संशोधन कार्यप्रणाली हे त्यांचे संशोधनाचे स्वारस्याचे विषय आहेत. त्या विविध संशोधन प्रकल्पांवरही कार्यरत राहिल्या आहेत, ज्यात मुंबईतील ज्येष्ठ नागरिक संघटना आणि वृद्धाश्रमांचा अभ्यास समाविष्ट आहे. त्या महाराष्ट्राच्या फेडरेशन ऑफ सीनियर सिटिझन्स ऑर्गनायझेशन्स (FESCOM) च्या शिखर संस्थेच्या मानद सदस्या आहेत.

Other Books