भारतासह पाच खंडांतील २१ देशांची माहिती देणारे, तुलनात्मक शिक्षणशास्त्र या विषयावरचे हे मराठीतील पहिलेच सविस्तर पुस्तक आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ वसंत काळपांडे यांनी सुरवातीलाच या नवीन ज्ञानशाखेचा परिचय करून दिला आहे, तसेच 'राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020' यासह भारतीय शालेय शिक्षणाबाबत विवेचन केले आहे. मूळ मराठी पण परदेशी स्थायिक झालेल्या विविध क्षेत्रांतील लोकांचे, काही काळ परदेशी वास्तव्य किंवा शैक्षणिक दौरा करून आलेल्या तज्ज्ञांचे लेख येथे आहेतच, पण त्या-त्या देशातील तज्ज्ञांचे आणि पालकांचेही लेखही आहेत.
आधुनिक संदर्भ, भरपूर डेटा, अनुभवकथन आणि विश्लेषण असे या लेखांतील आशयाचे विविधांगी स्वरूप आहे. शालेय शिक्षणाचे अभ्यासक, संशोधक,अधिकारी, शिक्षक, पालक, आणि सर्वसामान्य वाचक सर्वांनाच यातून घेण्यासारखे काहीतरी निश्चितच मिळेल. उत्कृष्ट निर्मितिमूल्ये असलेले आणि जगाच्या सर्व भागांचे 'शिक्षणाटन' घडवणारे हे पुस्तक सर्वांनी संग्रही ठेवावे असे आहे. ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ वसंत काळपांडे, धनवंती हर्डीकर यांच्यासह विविध देशांतील २० तज्ज्ञांच्या लेखणीतून साकारलेलेले....
२८८ पानांचे मोठ्या आकाराचे संपूर्ण रंगीत पुस्तक !
संकल्पना व मार्गदर्शन
डॉ. वसंत काळपांडे
डॉ. वसंत काळपांडे यांनी महाराष्ट्र राज्य शासनाच्या महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषद, महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, राज्य शिक्षण मंडळ, बालभारती, बालचित्रवाणी अशा शालेय शिक्षणाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या संस्थांमध्ये संचालक म्हणून काम केले आहे. आपल्या 35 वर्षांच्या कारकिर्दीत राज्य शासनाच्या अनेक महत्त्वाकांक्षी योजनांच्या आखणीत आणि यशस्वी अंमलबजावणीत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.
केंद्र सरकारच्या दिल्ली येथील राष्ट्रीय शैक्षणिक प्रशासन आणि नियोजन संस्थेतही त्यांनी काही काळ काम केले आहे. सेवानिवृत्तीनंतर ते शिक्षणक्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्थांना आणि व्यक्तींना मार्गदर्शन देत आहेत. केवळ शालेय शिक्षणावरील चर्चेसाठी त्यांनी सुरू केलेल्या व्हाट्सअॅप आणि फेसबुक ग्रुपचे 20 हजारपेक्षा जास्त सदस्य आहेत.
शालेय शिक्षण या विषयावर त्यांचे अनेक संशोधनपर लेख प्रसिद्ध झाले असून, वृत्तपत्रे व नियतकालिके यांमध्ये ते सातत्याने अभ्यासपूर्ण आणि परखड लेखन करत असतात. त्यांच्या ‘शालेय प्रशासन आणि मानवी संबंध’ या पुस्तकाला 1992 चा महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार मिळाला होता.